चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडे येथे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेला कॉंक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे असून कॉंक्रीटीकरणात १ कोटी वीस लाखांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडे गावात शाम प्रसाद मुखर्जी रूरबन मिशन योजनेअंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र सदर कॉंक्रीटीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे व इस्टिमेट प्रमाणे काम न होत असल्याने कॉंक्रीटीकरणात १ कोटी वीस लाखांचा अपहार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे. तत्पूर्वी कॉंक्रीटीकरणात वाळू किंवा खचखडीचा वापर न करता मातीचा वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच नियमानुसार लेअर खूप कमी आहे. अशीही संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी उमटविल्या.
यावेळी माजी सरपंच सचिदानंद जाधव, माजी सरपंच संजय कौतीक पाटील, महिला आघाडी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिता शिंदे, सेवानिवृत्त सैनिक सोनू महाजन, ग्रामपंचायत सदस्य अनिल माळी, ग्रामस्थ प्रविण पाटील,भोला कुमावत, मणिषा महाजन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.