अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातल पातोंडा येथील मूळ रहिवासी असलेले व नोकरीनिमित्ताने बाहेरगावी स्थायिक झालेले डॉ. सुभाष पाटील यांची पुणे येथील एसएनडीटी महाविद्यालयात पदोन्नती मिळवत प्राचार्यपदी नियुक्त झाली आहे. ते पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिरातील माजी विद्यार्थी होते.
डॉ. सुभाष पाटील यांनी अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून मार्ग काढत योग्य शिक्षण करून अभ्यासाच्या व हुशारीच्या बळावर यश संपादन करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी दहावी वर्गात असताना त्यांचे मायेचे छत्र हरपले आणि वडील व बहिणीची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. जबाबदारीचे भान व ओझं घेऊन त्यांनी अगदी रात्री अंगणातल्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीत घवघवीत यश मिळवले होते. पुढील शिक्षणही प्रतिकूल परिस्थितीत नाशिक येथे पूर्ण करून सन १९९५ यावर्षी महाराष्ट्र राज्याची सेट ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे येथील एसएनडीटी महाविद्यालयात प्राध्यापकपदी रुजू झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात देत चांगले दिवस येत असताना सन १९९६ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर वयाच्या ३६ व्या वर्षी अर्थशास्त्र विषयांत प्राविण्य मिळवत डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांचे विद्यादान सतत २५ वर्ष समाजाला अविरत ज्ञानाचा प्रकाश देत आहे. याचेच फलित म्हणून त्यांना नामांकित महाविद्यालयात पदोन्नती होऊन प्राचार्य पदाची सुवर्ण संधी मिळाली. त्यांच्या ह्या प्राचार्य पदाची नव्या अध्यायाने कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा अवलिया मोठ्या उच्च पदावर असूनही साधी राहणीमान सुसंस्कृत आणि विनम्रशील व्यक्तिमत्वाला पुरून उरणारा आहे. आणि गावाचे देणं म्हणून ते गावाशी नाड जोडून जमिनीवर पाय ठेवून आहेत.ते पातोंडा परिसर विकास मंचाचे जेष्ठ सदस्य आहेत.त्यांची पदोन्नती होऊन प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याने पातोंडा व पंचक्रोशीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.