पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालय ३० एप्रिल रोजी पाचोरा न्यायालयात संपन्न झाले.
राष्ट्रीय लोकन्यायालयात १५० दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी २३ लाख ६१ हजार २७१ रुपयांची वसुली तसेच २ हजार ४४८ वादपूर्व प्रकरणांचा निपटा होऊन ८५ लाख ९४ हजार ८१६ रुपयांची वसुली झाली. या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समिती पाचोरा चे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला हिवराळे, पंच सदस्य अॅड. संजय देवगया, वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. राजेंद्र पाटील तसेच जेष्ठ विधीज्ञ मंडळी उपस्थित होते. यावेळी भाऊबंदकीचा वाद असलेला वीस वर्षांपूर्वीचा जुना शेतीसंबंधी दिवाणी दावा निकाली काढण्यात आला. यात अॅड. सी. एस. शर्मा व ॲड. पी. के. कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश जी. बी. औंधकर व हिवराळे मॅडम यांच्या हस्ते उभयतांचे कौतुक अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रथमच यावेळी ई साक्ष नोंदवून ४ केसेस निकाली काढण्यात आल्या
यावेळी तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष जी. बी. औंधकर यांनी आवाहन केले की, यापुढे होणाऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवा व लोक न्यायालय चा लाभ घ्यावा, लोक न्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ अध्यक्ष व माननीय सभासद विधीज्ञ मंडळी तसेच पंचायत समिती, ग्रामसेवक वृंद, बँक कर्मचारी, दूरसंचार कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी व न्यायालयातील कर्मचारी वृंद आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.