पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा येथे ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी शनिवारी लस उपलब्ध झाल्याने पहिल्याच दिवशी शहरातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला ८४ दिवस पूर्ण झाल्याने व नागरिकांना दिवसेंदिवस लसीकरणाचे महत्व पटू लागल्याने शहरातील पंचायत समितीच्या सभापती क्वार्टर जवळ सुरू असलेल्या केंद्रावर लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपासून रांगा लावल्या होत्या. सकाळी १० वाजेच्या दरम्यान गर्दीमुळे कल्लोळ उडाल्याने पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात आले होते. पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात ३०० डोस उपलब्ध झाले. मात्र सुमारे ४०० च्या वर नागरिक उपस्थित असल्याने लस न मिळालेले नागरिक हताश होऊन माघारी फिरले. यावेळी नागरिकांनी पाचोरा शहरात लसीकरण केंद्र वाढविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पाचोरा तालुक्यात नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र ३००, लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्र ३००, लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र ३००, नांद्रा प्रा.आरोग्य केंद्र ३००, वरखेडी प्रा. आरोग्य केंद्र ३००, पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालय ३००, बाहेरपुरा भागातील ग्रामीण रुग्णालय ३००, पाचोरा ग्रामीण रुग्णालय ३००,असे एकूण २ हजार ४०० डोस उपलब्ध झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली. मात्र एकाच वेळी सर्व लसीकरण केंद्रावर १८ ते ४५ वर्षांवरील सर्व नागरीकांसाठी पहिला व दुसरा डोस दिला जात असल्याने प्राप्त झालेले २ हजार ४०० डोस एकाच दिवसात संपणार असल्याचेही डॉ.वाघ यांनी सांगितले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1461336494238860