पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथे अवैध रित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रक्टर पोलीस पाटील यांनी पकडून महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ट्रक्टर चालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरासह तालुक्यात गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरु असून आज सकाळी ९:३० च्या सुमारास तालुक्यातील लासगाव येथे कामावर तलाठी सुनील रामसिंग राजपूत हे जात असताना त्यांना नांद्रा गावाजवळ महिंद्रा कम्पनीचे अवैध वाळू ने भरलेले ट्रॅक्टर दिसून आले असता त्यास जागेवर थांबवून नांद्रा येथील पोलीस पाटील निलेश साळुंखे कोतवाल रा. सामनेर यांना फोन करून बोलवून घेतले. त्यावेळी सदर ट्रॅक्टर जागेवर उभे होते, त्यानंतर ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितले असता ट्रॅक्टर चालक विनोद अरुण कोळी (रा. कुरंगी)याने ट्रॅक्टर चालू करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे स्टेअरिंग पकडून ठेवले. त्यावेळी सदर जागेवर आलेले विनोद कोळी त्याचे तीन मित्रांनी मिळून तलाठी राजपूत यांच्या अंगावर येऊन धरून ठेवले व ट्रॅक्टर स्टेअरिंग बळजबरीने सोडवून तलाठ्याले उचलून बाजूला केले व तलाठ्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाळूने भरलेले ट्रॅक्टर विनोद कोळी व त्याच्या तीन साथीदारांनी संगनमताने चोरून नेले. त्यानंतर महसूल विभागाचे नांद्रा मंडळ अधिकारी प्रशांत पगार, तलाठी कैलास बहिर हे आले असता त्यांच्या मदतीने ट्रॅक्टर शोधून काढले सदर ट्रॅक्टर मधील वाळू कोठेतरी बाहेर फेकुन दिलेली दिसली सदरील ट्रॅक्टरचा पंचनामा करण्यात आला असून ट्रॅक्टर तहसिल आवारात जप्त करण्यात आले आहे तसेच आरोपी चालक विनोद कोळी सह त्याच्या तीन साथीदारा विरुद्ध तलाठी सुनील राजपूत यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्याद वरून भाग – ५,गु. र.नं. २५२ / २०२१,भादवी कलम३७९, ३५३, ३९३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विनोद कोळी यास पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य तिघांचा शोध घेत आहेत तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस राहुल मोरे करीत आहे.