पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोरोना काळातील महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार कार्यक्रमाचा पाचोरा येथे शुभारंभ करण्यात आला.
खानदेशातील सुप्रसिद्ध लोकशाहीर समाज भूषण शिवाजीराव पाटील व सहकारी यांच्याहस्ते २० जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता तहसिल आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शाहिरी लोककलेतून प्रचार प्रसाराच्या कार्यक्रमाला सुरुवात पाचोरा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करुन करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर शिवाजीराव पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांचा आपल्या शाहिरी पोवाड्यातून व लोकगीतातून विशेष ढंगाने प्रचार कार्यक्रम केला. त्याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने कोरोना काळातील केलेल्या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा शाहीर कलेतून शिवाजीराव पाटील व सहकाऱ्यांनी ढंगदार पद्धतीने सादर केला.
यावेळी शाहीर शिवाजीराव पाटील यांच्यासोबत शाहीर बाबुराव मोरे, विलास पाटील, नामदेव पाटील, मिलिंद शेळके, यश चव्हाण, गोकुळ पाटील, विलास पाटील, भरत पाटील, दिनेश महाजन सह दहा कलावंतांचा संच व उपस्थित श्रोते गण मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. २० जानेवारी ते २७ जानेवारी पाचोरा – भडगाव तालुक्यातील विविध गावांना या कार्यक्रमाद्वारे जागृत करण्यात येणार असल्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.