पाचोरा येथे वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत धुम स्टाईल लांबवली

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी भागातुन एका ६६ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी मोटरसायकल वरुन येत धुम स्टाईल लांबवली. महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कमलाबाई जेठानंद वरलानी (वय – ६६) रा. श्रीराम चौक, सिंधी कॉलनी, पाचोरा ह्या २२ डिसेंबर रोजी सायंकाळी फिरत  होत्या. यावेळी त्यांच्या पाठी मागुन २५ ते ३० वयोगटातील दोन तरुणांनी मोटरसायकलवरुन येवुन त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची ८८ हजार १७९ रुपये किंमतीची सोन्याची पोत व त्या पोतमध्ये ७ ग्रॅम वजनाचे ३६ हजार १७४ रुपये किंमतीचे पॅंन्डल असा एकूण १ लाख २४ हजार ३१३ रुपये किंमतीचा ऐवज गळ्यातुन ओढुन पोबारा केला. कमलाबाई वरलानी यांना काही कळायच्या आत मोटरसायकल स्वार चोरटे पसार झाले. कमलाबाई वरलानी यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध  चोरी गुन्हा नोंदविला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करित आहे.

Protected Content