पाचोरा, प्रतिनिधी | येथे तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांचे विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयात १ हजार १८९ दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होऊन १ कोटी ३२ लाख ४८ हजार ५६९ ची वसुली झाली. यावेळी वादातीत १०० तर वादपूर्व १ हजार ८९ प्रकरणे निकाली निघाली.
पाचोरा येथे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाने लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामकाज तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, पंच न्यायाधीश अॅड. कल्पना खेडकर यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती पाचोराचे सचिव अतुल पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, वकील मंचचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. अरुण भोई, जेष्ठ वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी यांनी आवाहन केले की, यापुढे होणाऱ्या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोकन्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ पाचोरा चे अध्यक्ष व सभासद वकील मंडळी, तसेच पंचायत समिती पाचोरा चे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक वृंद, बँक कर्मचारी, दूरसंचार विभाग, महावितरण कंपनीचे कर्मचारी तसेच सहाय्यक अधीक्षक जी. आर. पवार, ए. आर. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक अमित दायमा, कनिष्ठ सहाय्यक दिपक तायडे व न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.