भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची व आर्थिक नाडी सांभाळणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सदर निवडणुकी मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वात बाजार समितीसाठी विविध जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ‘ शिवालय’ आमदार किशोर अप्पा पाटील यांचे निवास तथा संपर्क कार्यालय,पाचोरा या ठिकाणी संपन्न झाल्या.
१८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या तब्बल ८७ जणांनी मुलाखती देत उमेदवारीची मागणी केली. यावेळी स्वतः आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, डॉ विशाल देवरे, तालुका प्रमुख सुनील पाटील, संजय पाटील,प्रताप पाटील, विकास पाटील, युवराज पाटील, राजेंद्र पाटील, वसंत पाटील यांनी इच्छुकांशी हितगुज साधत संभाव्य उमेदवारी बाबत चर्चा केली. तसेच आगामी काळात बाजार समितीवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा भगवा फडकेल असा अशा विश्वास व्यक्त केला.
बाजार समिती निवडणूकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ११७ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले असून ३ जणांनी नामांकन अर्ज भरले असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान एकूण १८ जागांसाठी होऊ घातलेल्या या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून सर्वसाधारण गटासाठी ७, महिला २, इतर मागासवर्ग १, विमुक्त जाती भटक्या जमाती १ ग्रामपंचायत गटातून ४ आशा एकूण ११ जागा असून ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागांपैकी २ जागा सर्वसाधारण, १ जागा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी तर आर्थिक दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव आहे. तसेच व्यापारी मतदार संघातून २ तर हमाल मापाडी गटातून १ जागा निवडून द्यावयाची आहे. दरम्यान २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ ला निकाल जाहीर होणार आहे.