जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेलेले वाळू वाहतूकीचे डंपर जळगाव शहरातील ओम ऑटो सेंटर येथे आढळून आला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता चोरीला गेलेला डंपर ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी डंपरला पाचोरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ४४३१) याच्यावर ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाचोरा महसूल पथकाने कारवाई करत डंपर हे पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. १२ डिसेंबर रोजी जमा केलेले वाळूचे डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांनी डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील पोहेकॉ अशरफ शेख, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड यांना करवाईसाठी रवाना केले. गोपनीय माहितीनुसार चोरी गेलेले डंपर हे जळगाव शहरातील ओम ऑटो सेंटर येथे प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जावून चोरीला गेलेले डंपर ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.