पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तहसील परिसरात वेळेत दंड न भरता अडकून पडलेल्या सुमारे ३० ट्रॅक्टर्सच्या जाहीर लिलावाचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील विविध नदी पत्रातून रात्री अपरात्री होणाऱ्या वाळू उपशाच्या विरोधात वेळोवेळी कारवाईचा सपाटा प्रशासनाच्या वतीने सुरूच असतो. कारवाई अंती जमा केलेल्या ट्रॅक्टर्सला शासनाच्या नियमांनुसार दंड वसुली केली जाते. यात अवैध वाळू वाहतूक करतांना प्रशासनाच्या वतीने पकडलेल्या ३० वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे. सदर वाहने नियमित भावाने लिलावात विक्री न झाल्यास भंगार म्हणून भंगार भावात लिलाव करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. चालू आर्थिक वर्षात महसूल प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्याने विक्रमी ५२ लक्ष रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र तरी देखील आतापर्यंत काही वाहनधारक दंड भरत नसल्याने अशा वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लिलावापूर्वी सदर ट्रॅक्टर मालकांनी दंड भरल्यास त्यांची वाहने नियमानुसार सोडण्यात येतील असेही प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.