नवी दिल्ली : वृत्तसंस्था| पाकव्याप्त काश्मीरच्या मार्गानं पाकिस्तानकडून हत्यारांचा मोठा साठा भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कारानं असाच पाकिस्तानचा दहशतवाद्यांना हत्यारं पुरवण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय.
‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संघटनेकडून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी एक बैठक बोलावण्यात येतेय. त्याचवेळी दुसरीकडे ही कारवाई करण्यात आली
उत्तर काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सेनेच्या जवानांनी किशनगंगा नदीच्या मार्गानं केल्या जाणाऱ्या हत्यारांच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय. सेनेनं राज्यातील पोलीस दलाच्या मदतीनं एका संयुक्त अभियानात पाकिस्तानचा हा कट उधळून लावलाय.
सेनेच्या जवानांच्या सर्व्हिलान्स तुकडीला शुक्रवारी रात्री नियंत्रण रेषेवर किशन गंगा नदीच्या तटावर तस्करीच्या कटाची माहिती मिळाली. लगेचच भारतीय सेनेच्या जवानांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीनं एक संयुक्त अभियान सुरू केलं.
रात्री जवानांनी २-३ दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा थांगपत्ता शोधून काढला. दशतवाद्यांकडून एका ट्यूबमधून काही वस्तू सीमेपलिकडे पोहचवण्याचा प्रयत्न सुरू होता. किशन गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ एका दोरीनं ही ट्यूब बांधलेली होती. ताबडतोब घटनास्थळी दाखल होत भारतीय जवानांनी हत्यारांचा मोठा साठा जप्त केला. यामध्ये चार एके ७४ रायफल, आठ मॅगझीन, २४० एके रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीरच्या भागातून दहशतवाद्यांना हत्यारं पोहचवण्याच्या घटना अनेकदा उघडकीस आलेल्या आहेत. सेनेची ही कारवाई यादृष्टीने महत्त्वाची आहे.