इंजिनिअरिंग प्रवेश पात्रता निकषात बदल; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार….

 

भुसावळ, प्रतिनिधी । अनेक वर्षांपासून इंजिनीअरिंग प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांत खुल्या प्रवर्गासाठी आणि आरक्षित प्रवर्गासाठी अनुक्रमे ५० व ४५ टक्के गुण आवश्यक होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निकषांमध्ये राज्य शासनाने शिथिलता आणून अनुक्रमे ४५ व ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक केले आहे.

कोरोना संसर्गाचा परिणाम होऊन विद्यार्थीं उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषानुसार महाराष्ट्र शासनाने देखील इंजिनिअरिंग पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांत खुल्या प्रवर्गासाठी किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आता आवश्यक आहे.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे निकष, पात्रता काय असावी, यासंदर्भात शुक्रवारी राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांमध्ये अधिक सुलभता येईल. कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळे आले. अनेक विद्यार्थ्यांना पीसीएम विषयात कमी गुण मिळाले आहेत. अश्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून ते प्रवेशापासून वंचित राहणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पीसीएम सीईटी परीक्षेची जोरदार तयारी सुरू करावी असे आवाहन श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी केले आहे.

सकारात्मक निर्णयामुळे विकासाला गती: डॉ.राहुल बारजिभे वर्षभर चांगला अभ्यास करून निर्णायक वेळेस अडचणी आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. कोरोनामुळे अभियांत्रिकी प्रवेश होणार की नाही त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत होते. या निर्णयामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी मिळेल. परिणामी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचणार असून यामुळे विकासालाही गती मिळेल असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content