नवी दिल्ली, वृत्तसंस्था । लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव अद्यापही कायम आहे. या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. परंतु, दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ‘भारत आणि चीन दरम्यान युद्धाची परिस्थिती निर्माण झालीच तर अशा वेळी पाकिस्तानही या युद्धात सहभागी होईल’ असं म्हणत सूचक इशारा केलाय.
‘माझं वक्तव्य लक्षात ठेवा, चीनसोबत युद्ध झालंच तर यात पाकिस्तानही सहभागी होईल. चीनचे सैनिक काही पहिल्यांदाच गलवानमध्ये घुसलेले नाहीत. १९६२ सालीही ते इथे आले होते. परंतु, तत्थ हे आहे की त्यावेळी आपण आत्तापेक्षा जास्त मजबूत स्थितीत होतो. सध्या आपल्या सेनेच्या १० ब्रिगेड तिथं तैनात आहेत. आपल्यावर हल्ला करण्याची चीनची योजना असेल तर ही खूपच मोठा मूर्खपणा असेल. १९६७ सालीही खुनी हिंसा झाली होती. पुन्हा एकदा असंच होईल’ असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय.
‘चीनकडून तिबेटच्या पठारापासून ते हिंद महासागरापर्यंत या क्षेत्रात विस्तारवादाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी भारताला आपली सेना मजबूत करण्याची गरज आहे. चीनकडून हिमाचल प्रदेशच्या भागाची मागणी केली जातेय. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही घुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही त्यांना सेनेच्या बळावरच रोखू शकता. आपण मजबूत स्थितीत असू तर समोरचा तीन वेळा विचार करेल’ असंही अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय.
दोन दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘करार आणि सहमतींचा सन्मान करत सीमा वादावर तोडगा काढला जावा’ असं वक्तव्या करतानाच सध्याची लडाखची स्थिती १९६२ च्या संघर्षानंतर ‘सर्वात गंभीर’ असल्याचं म्हटलं होतं.