पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या पांढऱ्या सोन्यावर आता चोरटे डल्ला मारत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जात आहे. नगरदेवळा ता. पाचोरा येथे दोन शेतकऱ्यांचा २ लाख रुपयांचा २८ क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरटे शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस वेचणी करुन चोरुन नेत असल्याच्या घटना समोर आल्या असतांना आता थेट वेचणी करुन साठवून ठेवलेल्या कापसावरही चोरटे डल्ला मारत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील शेतकरी दिवानसिंग राऊळ यांच्या पिंपळगाव खु” शिवारातील वेचणी केलेला कापूस २ जानेवारी रोजी पत्र्याच्या शेड मधे ठेवलेला होता. तसेच दुसरे शेतकरी राजेंद्र सरदारसिंग राऊळ यांनी शेतीमाल ठेवण्यासाठी शेतात गोडाऊन बनविले आहे. याच शेडमधे उमेश राऊळ यांचा वेचनी केलेला जवळपास २० क्विंटल कापूस साठवून ठेवला होता. चोरट्यांना याची चाहूल लागताच मध्यरात्री गोडाउनचा कडी कोंडा तोडून आत मधे प्रवेश करून वेचणी करुन ठेवलेला कापूस त्याची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार व दुसऱ्या ठिकाणी झालेल्या चोरीत अंदाजे ४८ हजार एवढ्या किंमतीचा कापुस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. शेतकरी सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तत्काळ याची महिती पोलिसांना देण्यात आली असुन प्राथमिक स्वरूपात पंचनामा करण्यात आला आहे. संबधित शेतकरी दिवानसिंग राऊळ व राजेंद्रसिंग राऊळ यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा दुरशेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.