पहूर, प्रतिनिधी । डॉ.हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शोभायात्रेची सुरूवात शाळेच्या प्रांगणातून झाली. अश्वारूढ शिवराय, राजमाता जिजाऊ यांच्या सह विविध सजीव देखावे तसेच लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथकांच्या सादरीकरणाने सर्वाचीच मने जिंकली. मावळ्यांच्या वेषभुषेतील सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.यावेळी गावातील माता बगीनींनी शोभायात्रेचा मार्ग सुशोभित केला होता.
भगव्या ध्वजांनी सारा परिसर भगवेमय झाला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी सारा आसमंत निनादून निघाला. शोभायात्रा बसस्थानक चौक, होळी मैदान, विठ्ठल मंदिर, गढी चौक उभी गल्ली मार्गे जाऊन समारोप शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेंदुर्णी येथील उत्तम थोरात यांचे प्रेरणादायी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरूवातीला कोमल सोनवणे या विद्यार्थ्यांनीने प्रेरणा गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे हे होते. यावेळी संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी, पालक, व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व्ही. व्ही. घोंगडे, अजय देशमुख, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हरीभाऊ राऊत यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालकांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी तर आभार हरीभाऊ राऊत यांनी मानले. तसेच मराठा महासंघ व गृप ग्रामपंचायत पहूर पेठ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी बस स्थानक परिसरात शिवप्रतीमेचे पुजन करण्यात आले. काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सरपंच निताताई पाटील, प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष चिंचोले, संजय तायडे, गणेश पांढरे, जेष्ठ पत्रकार शांताराम लाठे , माऊली अंगणवाडीकांचे अध्यक्ष सुषमा चव्हाण यांच्या सह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.