पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी । येथे आज एका ५५ वर्षे वयाच्या भाजीपाला विक्रेत्या महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून यामुळे येथील कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे.
आज सकाळी पहूर कसबे येथे शिवनगर भागात ५५ वर्षीय भाजीपाला विक्रेत्या महिलेस कोरोना संसर्गाची बाधा झाल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली. विविध भागातील रहीवाश्यांचे अहवाल पॉझीटीव्ह येत असल्याने कोरोना संक्रमणाची साखळी कार्यान्वीत होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पहूर ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्ध्या स्विपर बॉयच्या संपर्कातील १० , संतोषी माता नगर येथील मुळ रहीवासी शिक्षकाच्या संपर्कातील ६ तसेच शिवनगरातील भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या कुटुंबातील ५ जणांचे आर . टी .लेले विद्यालय व महावीर पब्लिक स्कूल या क्वारंटाईन सेंटरवर संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमूने घेण्यात आले आहेत.
दरम्यान, पहूर येथे कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी पहूर पोलीस स्टेशन हद्दीत दररोज बाजार भरत असून पहूर बसस्थानक परिसरात व्यावसायिक व नागरिक यांची विना मास्क रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.