पहूर , ता . जामनेर -( वार्ताहर )- राखेने भरलेला टॅंकर रस्त्यावरील भराव खचून उलटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला . ही घटना पहूर – जामनेर महामार्गावर सोनाळा फाटया जवळ आज रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली .
सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत भरावाचे काम सुरू आहे . दिपनगरहून परभणी कडे ४०टन राख घेऊन जाणारे राधे एंटरप्रायजेस , परळीचे टँकर ( क्र. एम .एच .४४ -९२२७ ) कच्च्या रस्त्यावरील भराव खचल्यामुळे पलटी झाले . या अपघातात सुदाम बाबूराव पारडे (वय २७ ) रा .अमलगाव ता . गंगाखेड ,जि.परभणी या टँकर चालकाचा टँकरखाली दाबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली . जामनेरला शासकिय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . या प्रकरणी सातिष गोरोबा जंगले रा . सिद्धार्थनगर, जि . परभणी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास श्री. शिंपी करित आहेत. गेल्या महिन्यातही या रस्त्यावर पाणी टॅंकरच्या अपघातात एकाजनाचा मृत्यू झाला होता . कंत्राटदाराने रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष्य देण्याची गरज आहे .