पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूरपेठ ग्रामपंचायत कार्यालयात असणारे सीसीटीव्ही कॅमेरे व रिसिव्हर फोडून तलाठी कार्यालयातील १३ हजार रूपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे.
पहूर बसस्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत इमारत असून याच अंतर्गत तलाठी कार्यालय आहे. हा अत्यंत वर्दळीचा परीसर आहे. यात पहूर पेठ ग्रामपंचायत मधील कँमेरे व रिसीव्हर याची अज्ञात चोरट्याने तोडफोड करून येथीलच तलाठी कार्यालय फोडून तेरा हजार दोनशे पस्तीस रूपयांची रोकडा शासकीय भरणा लांबविल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात चोरट्याने कार्यालयाच्या मागील बाजुने प्रवेश करीत पेठ ग्रामपंचायत मधील सीसीटीव्ही कॅमेरे व रिसीव्हर ची तोडफोड करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर या इमारतीतच शेजारील तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात महसुलची तेरा हजार दोनशे पस्तीस वसुली ची रक्कम कपाटातून लंपास केली आहे. ही चोरी पाळत ठेवून आसपास च्या भुरट्या चोराने केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनास्थळी साहाय्यक फौजदार अनिल अहिरे,कोतवाल भानुदास वानखेडे, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी पाहणी केली. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.