प्रयागराज वृत्तसंस्था । मकर संक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासोबतच कुंभमेळ्यास प्रारंभ झाला असून या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.
आज भल्या पहाटे १३ आखाड्याच्या साधूंनी पवित्र संगमावर स्नान केले. यानंतर आबालवृध्दांनी पवित्र पर्वणीवर संगमात स्नान करण्याचा लाभ घेतला. आज सुमारे १.२ करोड भाविक स्नान करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांच्या सुविधेसाठी योगी सरकारने अतिशय जय्यत तयारी केलेली आहे. यामध्ये आपत्कालीन सर्व सुविधांसह अतिशय कडेकोट पोलीस बंदाबस्त लावण्यात आलेला आहे.
१५ जानेवारी ते ४ मार्च या ४९ दिवसांच्या काळात हा मेळा चालणार आहे. तर कुंभमेळ्याच्या पहिल्या तीन दिवसांपर्यंत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात १३ ते १५ कोटी लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्यासाठी तब्बल ५० कोटी रुपये खर्च करून ४ टेंट सिटी उभारण्यात आल्या आहेत. त्यांना कल्पवृक्ष, कुंभ कॅन्व्हास, वैदिक टेंट सिटी व इंद्रप्रस्थम सिटी अशी नावे देण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करण्यात आला आहे.