जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील तरूणाची दुसऱ्यांदा दुचाकी घरासमोरून चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडीस आली. यापुर्वी एमआयडीसी पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळटाळ केली जात होती. मात्र त्याच तरूणाची दुसऱ्यांदा दुचाकी चोरीस गेल्याने एमआयडीसी पोलीसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, दिपक चांगो पाटील (वय-३३) रा. शिरसोली ता. जळगाव हे शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीपी ६६१६) क्रमांकाची दुचाकीचा वापर करतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिरसोलीमध्ये राहणाऱ्या मावसभावाकडे ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवणाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने ते भावाकडे दुचाकीने गेले. घरासमोरील पोर्चमध्ये दुचाकी पार्किंग करून लावली. तेथेच जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याचे सकाळी उघडकीस आले.
दिपक पाटील यांची यापुर्वी १४ जुलै २०२० रोजी देखील तालुक्यातील कुऱ्हाडदा शेतशिवारातून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीबी २८२३) क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी शेतातून चोरून नेली होती. दरम्यान, त्यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता ऑनलाईन नोंद करण्यास अडचणी येत असल्याचे कारण दाखवून टाळाटाळ केली. त्यावेळी अदाखलपात्र म्हणून किरकोळ नोंद करण्यात आली होती. तिचा शोध लागत नाही तोच आता त्यांची नवीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. दुचाकी चोरीची दुसरी घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात दोन्ही दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबर जितेंद्र राठोड करीत आहे.