पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी ; ओपिनिय पोलचा अंदाज

 

 

नवी  दिल्ली : वृत्तसंस्था । ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळू शकतात. तर २०० जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला ९२ ते १०८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तृणमूलला ४३ टक्के, तर भाजपाला ३८ टक्के मतं मिळू शकतात.

 

तृणमूल काँग्रेस  व  भाजपा यांच्या राजकीय संघर्षामुळे  संवेदनशील बनलेल्या पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता प्रचारात रंग भरण्याबरोबरच राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपानं विशेष जोर लावलेला असून, २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावाही केला आहे. मात्र, ओपिनियन पोलमधून बंगालमधील निकालांचं चित्र वेगळं दिसत आहे.

 

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या ओपिनिय पोल सर्व्हेतून पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरीत कुणाचं सरकार येणार याविषयीची पाहणी करण्यात आली. या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगालवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलं असून, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसविरोधात आघाडीचं उघडली आहे.

 

मागील आठवड्यात सरकार कोसळेल्या पद्दुचेरीतही विधानसभा निवडणूका होत आहे. ३० जागांसाठी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहे. एनडीएला ४६ टक्के मते, तर काँग्रेस ३६ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आधारावर एनडीएला १७ ते २१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस आघाडीला ८ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

सध्या केरळमध्ये सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडीचं सरकार सत्तेत आहे. डाव्याचं वर्चस्व असलेल्या केरळात यावेळीही भाजपाच्या पदरी निराशाचं पडण्याची शक्यता आहे. एलडीएफ आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत ८३ ते ९१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीला ४७ ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला जास्तीत जास्त दोन जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

 

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आघाडीला २९ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे द्रमुकला ४१ टक्के मतं पडू शकतात. जागांचं गणित बघितलं तर अण्णाद्रमुकला ५८ ते ६६ जागा मिळू शकतात. दुसरीकडे द्रमुक आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे. द्रमुकला १५४ ते १६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 

ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार आसाममध्ये भाजपाप्रणित एनडीएच्या पारड्यात ४२ टक्के मत पडण्याचा कल दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला ३१ टक्के मतं मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यात २७ टक्के मतं पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ओपिनियन पोलनुसार १२६ जागा असलेल्या विधानसभेत भाजपाला ६८ ते ७६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कांग्रेसला ४३ ते ५१ जागा मिळू शकतात. आसाममध्ये बहुमताचा आकडा ६४ आहे.

 

 

२९४ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राजकारण शिगेला पोहोचलं आहे. भाजपा-तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडताना दिसत असून, दोन्ही पक्ष जोर लावताना दिसत आहे. भाजपानंही बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, यावेळस सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

 

Protected Content