कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील चर्चा पार पडली. आतापर्यंत १९३ जागांवर दोन्ही पक्षांची वाटाघाटी यशस्वी झाल्याची माहिती काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यानी दिली
काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार, काँग्रेस ९२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, डावे पक्ष १०१ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे. उर्वरीत १०१ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या पक्षांकडून सोमवारी निर्णय घेण्यात आला होता की, ते २०१६ मधील निवडणुकीत क्रमश: विजयी झालेल्या जागांवर निवडणूक लढवतील. २०१६ मध्ये डावे पक्ष व काँग्रेस आघाडीने ७७ जागा जिंकल्या होत्या, ज्यामध्ये ४४ जागांवर काँग्रेस विजयी झाली होती.
याचबरोबर डाव्या पक्षांचा सहकाऱ्याच्या रुपात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने २५ जागांवर निवडणूक लढवून दोन जागी विजय मिळवला होता. सीपीआयने ११ जागा लढवून एक जागा जिंकली होती. तर, रिवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीने १९ जागा लढवून ३ जागा जिंकल्या होत्या.