जळगाव, प्रतिनिधी । जीवन पूर्ण संमर्पणाचे पूर्ण त्यागाचे जीवन आहे. परमात्मा जसे, जिथे ठेवायचं ठरवतो तसे राहण्याची व्यक्तीची तयारी असावी. प्रेमाचा स्वभाव असतो स्वतःमध्ये बदल करणे. जशी परिस्थिती असेल त्याठिकाणी तसे आपल्याला परिवर्तीत करायला हवे. संसारातील लोक तुमच्याशी संबंध जोडतीलही आणि ते निभावणार नाही असे होवू शकते परंतु परमात्मा जोडलेला संबंध कधीही तोडत नाही, असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.
शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित 21 दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाच्या बाराव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, आपल्याला असे वाटते की जे चांगले होतेय त्याचे श्रेय आपल्याला भेटायला हवे आणि जे चुकीचे झाले त्याचा दोष दुसर्यांना मिळायला हवा. सत्यात जगायला शिका. चुकीचे झाले ते माझ्याकडून झाले आणि चांगले झाले ते दुसर्याकडून झाले हे स्विकारा. सासूंनी सूनेची ढाल म्हणून रहायला हवे. जर सूनेकडून काही चूक झाली तर सांगा की माझ्यामुळे झाली. तुम्ही घरातल्या मालकीन आहे. तुम्हाला बोलायची कुणाची हिम्मत होणार नाही. परंतु नंतर सूनेला वाटेल की सासू माझी आई आहे. आई-आई का असते कारण ती ढाल बनून मागे उभी राहते. सासू कधी ढाल म्हणून मागे उभी नाही राहत, असे स्वामीजींनी सांगितले.
स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी पुढे सांगितले की, इंद्रियांच्या समुदायाच्या सुरक्षेची जबाबदारी दुसर्यांवर सोपवायला नको. आपल्यासमोर कुणी निंदा करणार नाही तर मी ऐकणार नाही. संसाराची चर्चा जर कुणी ऐकविणार नाही तर मी ऐकणार नाही ही साधकाची पराधिनता नाही. आपल्यासमोर जर कुणी सुंदर व्यक्ती येणार नाही याचे भान सेवकाने ठेवायला हवे. कारण सुंदर व्यक्ती आल्याने आपल्या मनात आकर्षण येते. जर असे मनात असेल तर तो साधक नाही. साधकाने सावधान रहायला हवे किती बोलायचं, पहायचं याची सावधगिरी स्वतः बाळगायला हवी, असे स्वामीजींनी सांगितले.
बालगोपालच्या सजीव आरासने वेधले लक्ष
श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा महोत्सवात बाराव्या दिवशी एका सत्रात भगवान श्रीकृष्ण लिला तर दुसर्या सत्रात उखळ बधन लिलाची सजीव आरास साकारण्यात आली.