परमबीर सिंगांनी खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा आरोप

मुंबई: वृत्तसंस्था ।  2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले असा आरोप करीत क्रिकेट बुकी  सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत. 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरच आता पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत.

 सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरणा तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंह यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांनी आपल्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये उकळले. परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी. आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली. ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.

Protected Content