पुणे : वृत्तसंस्था । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीयांबाबतची भूमिका सोडली तरच त्यांच्या सोबत भाजपची युती होऊ शकते असे महत्वपूर्ण विधान आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पुण्यात चंद्रकात पाटील म्हणाले, “जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत त्यांच्याशी युती होणार नाही आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे ? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.