जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधी परजिल्ह्यांमधून जिल्ह्यात येणार्यांवर गुन्हा दाखल होणार असून कुणी नागरिक आपल्या जिल्ह्यात आल्यास याची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, वाढीव लॉकडाऊनच्या कालावधीत निवारागृहात असलेले राज्याच्या इतर जिल्ह्यातील नागरीकांना त्यांच्या मुळगावी जायचे असल्यास तशी व्यवस्था करावी. परप्रांतातील नागरीकांबाबत शासनाच्या सुचना येईपर्यंत त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. जळगाव येथील कोविड १९ रुग्णालयात सध्या ११८ व्यक्ती दाखल आहेत. येथील परिस्थिती लक्षात घेता कोरानाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर तालुक्याच्या ठिकाणीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात यावे. तसेच आवश्यकता भासत असल्यास त्यांना तीथेच डमिट करुन घ्यावे. तसेच ज्या व्यक्तींना सामाजिक क्वारंटाईन करावयाचे आहे. त्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी ठेवावे. त्यांना कोविड रुग्णालयात आणण्याची आणू नये.
गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील तपासणी नाक्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असता. बुलढाणा, औरंगाबाद, मालेगांव या हॉटस्पॉटमुळे जिल्ह्याला अधीक धोका आहे. त्यातच धुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमळनेर, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यातील नागरीकांना अधिक सजग रहावे. यापुढे इतर जिल्ह्यातून कोणीही नागरीक आपल्या जिल्ह्यात आल्यास तो ज्या मार्गाने आला त्या मार्गावर बंदोबस्तास असलेल्या अधिकार्यांबरोबरच तो ज्या गावात आला त्या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांचेवरही कारवाई करण्याचा इशारा दिला असून येणार्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची सुचना पोलीस यंत्रणेला दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी आपली व कुटूंबाची काळजी घ्यावी. लॉकडाऊनचे पालन करावे. शासनाच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मीच माझा रक्षक ही भूमिका प्रत्येक नागरीकांने घ्यावी. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासनास नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले आहे.
त्याचबरोबर स्वस्त धान्य वाटपाच्यावेळी स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी त्या भागातील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. शासनाच्या नियमानुसार पात्र सर्व लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होणार असल्याने नागरीकांनी गर्दी करु नये. असेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००