अहमदनगर : वृत्तसंस्था । अहमदनगर जिल्ह्यातील डॉ महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईनद्वारे इंजेक्शन देऊन गळफास घेतला. विशेष म्हणजे डायरीत २२ नोव्हेंबर २०२१ या पानावर त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे.
ज्यामध्ये आपल्या मोठ्या मुलाच्या बहिरेपणाच्या त्रासाचा उल्लेख केला आहे.
कर्जत तालुक्यातील राशीन गावात राहणाऱ्या कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने खळबळ उडाली आहे. डॉ महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईनद्वारे इंजेक्शन दिले. त्यानंतर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं म्हटलं जातं.
विशेष म्हणजे गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी “माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत” असा उल्लेख केला आहे.
आत्महत्या केलेल्यांची नावे – महेंद्र थोरात ( वय ४६) , वर्षाराणी थोरात ( वय ४२) . कृष्णा थोरात ( वय १६) ., कैवल्य थोरात ( वय ६)
“आम्ही आज आपल्यापासून कायमचा निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकायला येत नाही. कृष्णाचे समाजामध्ये अपराधीपणासारखे आणि अपमानास्पद राहणे आता आम्हाला सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालेलो आहोत. कृष्णाचे पण कशात मन लागत नाही, समाधान वाटत नाही, सतत त्यालाही वाईट वाटते. परंतु तो कधी म्हणून दाखवत नाही.” असा उल्लेख डॉक्टर महेंद्र थोरात यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.
“एक आई-वडील म्हणून त्याला असणारे आणि होणारे दुःख आम्ही सहन करु शकत नाही. मी आणि माझी मिसेस सौ वर्षा आम्ही दोघांनी मिळून, चर्चा करुन, विचाराने निर्णय घेत आहोत. असे कृत्य करणे आम्हालापण योग्य वाटत नाही. कृपया आम्हाला क्षमा करावी. या घटनेमुळे कोणालाही प्रत्यक्ष किमवा अप्रत्यक्षपणे दोषी समजू नये” असेही या चिठ्ठीत लिहिले आहे.