पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सन-२००० या वर्षी पाचोरा न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या माहेरहून फर्निचर बनविण्यासाठी पैसे आणावे यासाठी होत असलेल्या विवाहितेचा छळ प्रकरणातील मुख्य आरोपीस तब्बल २३ वर्षांनी बडोदा (गुजरात) येथुन पाचोरा पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले आहे. या कामगिरीबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विश्वास (मल्हार) देशमुख व बाबासाहेब पगारे या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, दुकानाचे फर्निचर बनविण्यासाठी माहेरहून पैसे आणावे या मागणीसाठी बेलदारवाडी येथील माहेरवाशिणीचा शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. विवाहितेच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने विवाहिता ही त्रास सहन करत राहिली. मात्र नियमित होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर सन – २००० मध्ये विवाहितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. व न्यायालयात आर.सी.सी.क्रं. ११५/२००० केस दाखल केली होती. या प्रकरणातील आरोपी बाळासाहेब दौलत कुमावत (पती) हा न्यायालयात हजर राहत नसल्याने पाचोरा न्यायालयाने बाळासाहेब कुमावत याचे विरुध्द नाॅन बेलेबल वाॅरंट जारी करत पाचोरा पोलिसांना आरोपीस पकडुन आणण्याचे आदेषीत केले असता पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विश्वास देशमुख व बाबासाहेब पगारे यांचे एक पथक तयार करत गुजरात राज्यात रवाना झाले. गुजरात राज्यात बडोदा येथे बाळासाहेब कुमावत असल्याची गुप्त माहिती पथकास मिळाल्यानंतर पथकाने आपला मोर्चा बडोद्याच्या दिशेने वळविला. सर्व प्रथम विश्वास देशमुख व बाबासाहेब पगारे यांना माहिती मिळाली की, बाळासाहेब कुमावत यांचा मुलगा भाजीपाला विक्री व्यवसाय करतो.
त्या माहितीच्या आधारे पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेत चौकशी सुरु केली. व इतर भाजीपाला विक्रेत्यांकडुन माहिती एकत्रित करून अखेर बाळासाहेब कुमावत यांच्या घराचा पत्ता शोधुन काढत त्यांना घरुन ताब्यात घेत बापोत (बडोदा) पोलिस स्टेशनमध्ये आरोपीस दाखल करुन योग्य ती कागदी कारवाई करुन पाचोरा न्यायालयात हजर केले असता पाचोरा न्यायालयाने बाळासाहेब कुमावत यांची जळगाव येथील कारागृहात रवानगी केली आहे. तब्बल २३ वर्षांनी भा.द.वी. कलम – ४९८, ३२३, ५०४, ५०६ या कलमांखाली पसार असलेल्या बाळासाहेब कुमावत यांना पोलिस नाईक विश्वास देशमुख व बाबासाहेब पगारे यांनी अटक करुन न्यायालयाच्या स्वाधिन केल्याने विश्वास देशमुख व बाबासाहेब पगारे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.