जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या खून केल्याच्या गुन्ह्यात पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्या.आर.जे. कटारिया यांनी हा निकाल दिला.
अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वेरूळी खुर्द येथील रहिवाशी रवींद्र सुपडू पाटील (वय-३८) हा ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी दारू पिण्यासाठी बाहेर जायला निघाला असता पत्नी उमा हिने त्यास विरोध केला होता. त्यामुळे रात्री १ वाजता रवींद्र पाटील याने पत्नी उमा हिचा गळा दाबून व विष पाजून हत्या केली होती. मयत उमा हिचा भाऊ गौरव युवराज पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी अनिल शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात चालला. यात सरकारतफेर् ११ साक्षीदार तपासण्यात आले. मयताचा मुलगा व प्रत्यक्षदशर्प साक्षीदार असलेला सोहम रवींद्र पाटील याच्यासह शवविच्छेदन करणारे डॉ.रमेश गढरी, वैद्यकिय तपासणी करणारे डॉ. अमित साळुंखे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी पुराव्याच्या आधारावर प्रखर युक्तीवाद करुन आरोपीला जन्मठेपेचीच शिक्षा मिळावी म्हणून मागणी केली. न्यायालयाने समोर आलेले पुरावे व सरकारी वकीलांचे मुद्दे पाहता आरोपी दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीकडून ॲड.अविनाश जाधव यांनी बाजू मांडली.