मुंबई (वृत्तसंस्था)। भारत-चीन सीमारेषेवर तैनात असताना लागलेल्या आगीत मेजर प्रसाद गणेश महाडिक यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांची पत्नी गौरी यांनी आपली सरकारी नोकरी सोडून लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर आता गौरी महाडिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्यास सज्ज झाल्या आहेत.
माझ्याकडे एक चांगली नोकरी होती, पण पतीच्या मृत्यूनंतर मी नोकरी सोडली आणि लष्करात भरती होण्यासाठी तयारी करु लागले. माझ्या पतीला श्रद्धांजली देण्यासाठी मी लष्करात भरती होणार आहे. भरती झाल्यानंतर मला जो गणवेश मिळेल, तो फक्त माझा एकटीचा नसेल तर आम्हा दोघांचा असेल’, अशी भावना गौरी यांनी व्यक्त केली आहे. गौरी आणि मेजर प्रसाद यांचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. विरारमध्य दोघे आपल्या कुटुंबासोबत ते राहत होते. गौरी महाडीक यांनी दुसऱ्या प्रयत्नात सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची (एसएसबी) परिक्षा यशस्वीपणे पार पाडली आहे. यावेळी त्यांच्यासोबत १६ उमेदवार होते. गौरी यांनी त्यात पहिला क्रमांक मिळवत परिक्षा उत्तीर्ण केली होती.
भारतीय लष्कराच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्यास गौरी महाडिक सज्ज झाल्या आहेत. चेन्नई येथे एप्रिल महिन्यात त्या रुजू होतील. यावेळी त्यांना ४९ आठवडे प्रशिक्षण दिलं जाईल. एक वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू करण्यात येईल.