मुंबई प्रतिनिधी- भारतीय जनता पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली.
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून यात गेल्या काही दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार सोबत सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सुद्धा या दोन्ही मान्यवरांची महत्त्वाची भूमिका होती. काल सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ जाहीर करून त्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन केले होते. यावर पडळकर आणि खोत यांनी आज सकाळी अकरा वाजता आपण भूमिका स्पष्ट करू असे जाहीर केले होते. या अनुषंगाने या दोन्ही आमदारांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी पगार वाढ जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची पगार वाढ जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुढे न्यावा की मागे घ्यावा ही त्यांची भूमिका आहे. मात्र आम्ही दोन्ही या संपातून माघार घेत असल्याचे आमदार पडळकर म्हणाले.