मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थकीत पगाराची मागणी केल्याच्या रागातून ढाबा मालकाने वॉचमनच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर महामार्गावरील उचंदा शिवारात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोकुळ तारासिंग जाधव (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून ढाबा मालक कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर रोडवरील ‘शेर-ए-पंजाब’ ढाब्यावर गोकुळ जाधव हे वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी सुमित्राबाई जाधव या याच ढाब्यावर पोळ्या बनवण्याचे काम करीत होत्या. मागील दोन ते तीन महिन्यांपासून या दांपत्याचा पगार थकीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गोकुळ जाधव हे आपला थकीत पगार मिळावा यासाठी ढाबा मालकाकडे सातत्याने मागणी करीत होते.

दरम्यान, १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास ढाब्यावर काम सुरू असताना, मालक कमलजितसिंग हा एका व्यक्तीला गोकुळ जाधव यांच्या डोक्यात काठी मारल्याचे सांगत असल्याचे सुमित्राबाई यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी कमलजितसिंगला आपल्या पतीला का मारले, असा जाब विचारला. त्यावेळी गोकुळ जाधव हे काही दिवसांपासून पगार मागत होते आणि त्याच कारणावरून काठीने मारल्याचे आरोपीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
यानंतर सुमित्राबाई यांनी तातडीने रस्त्यापलीकडील गॅरेजच्या परिसरात धाव घेतली. तेथे गोकुळ जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळले. पत्नीने त्यांना ढाब्यावर आणले. सकाळी स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून त्यांना सलाईन लावण्यात आले. त्यानंतर त्यांचा मुलगा भगीरथ तसेच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. गोकुळ जाधव यांना पुढील उपचारासाठी प्रथम भुसावळ येथे नेण्यात आले. मात्र, भुसावळ येथे उपचाराचा खर्च अधिक असल्याने त्यांना रुग्णवाहिकेने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
गोकुळ जाधव यांच्या मृत्यूनंतर पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय ५५, रा. मुक्ताईनगर, मूळ रा. निंबापूर, जि. बुरहानपूर) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, थकीत पगाराचे पैसे मागितल्याच्या रागातून गोकुळ जाधव यांच्या डोक्यात काठीने मारून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी ढाबा मालक कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित तरतुदींनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील नेमका घटनाक्रम, मारहाणीचे कारण, आरोपीची भूमिका आणि इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.



