पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, कोरोना लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या ; भाजपा खासदाराची मागणी

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  पंतप्रधान कार्यालय कोरोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची परिस्थिती हाताळण्याची  सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी आता थेट भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी केलीय.

देशामध्ये दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत.परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.  स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.

 

“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या  युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

अन्य एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केलीय.

 

गडकरीच का असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामींनी, “कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय”, असं सांगितलं.

 

गडकरींकडे कोरोनाविरुद्धच्या मोहिमेचा सर्व कारभार द्यावा या स्वामींच्या मागणीला अनेकांनी सहमती दर्शवल्याचं ट्विटरवर पहायला मिळत आहे. गडकरी हा शब्द ट्विटरवर ट्रेण्ड होत असून स्वामींनी सुचवलेला पर्याय अगदीच योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. लेखक  सुशील सेठ यांनीही गडकरींना या कामासाठी नियुक्त केलं पाहिजे अशी मागणी करणारं ट्विट केलं आहे.

 

 

Protected Content