नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गावातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, तसेच शहर गावादरम्यान अंतर कमी करण्यासाठी ई-ग्राम स्वराज्य सुरू करण्यात आले आहे. आपल्याला स्वावलंबी बनावेच लागेल. पंचायत व्यवस्था जेवढी मजबूत होईल तेवढा अधिक विकास होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पंचायत राज दिनानिमित्त त्यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
स्वामित्व योजनेनुसार सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून संपत्तीचा लेखाजोखा घेतला जाईल, त्यानुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल, त्यामुळे वाद मिटतील आणि कर्ज घेणे सुलभ होईल, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात प्रायोगित तत्वावर ही योजना सुरु होईल. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करुन देशभर लागू करण्यात येईल. कोरोनाने आपल्याला स्वावलंबी बनण्यास शिकवले. स्वावलंबी बनल्याशिवाय कोणत्याही संकटाचा सामना करणे अशक्य आहे. गाव, जिल्हे, राज्य, देश हे या निमित्ताने आपापल्या स्तरावर स्वावलंबी बनले. यापुढे आपल्याला कोणत्याही गोष्टींसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये इतके स्वावलंबी राहावे लागेल. सशक्त पंचायत हे स्वावलंबनाचे उदाहरण आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.