मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाने आता भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन आमंत्रीत केले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने अतिशय आक्रमकपणे महाराष्ट्रात एंट्री करण्याची तयारी केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बीआरएस पक्ष महाराष्ट्रात आपली पाळेमुळे मजबूत करण्याच्या नियोजनात गर्क झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्यात मराठवाड्याला टार्गेट केल्यानंतर बीआरएस आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी चाचपणी करत आहे. यातच आता चंद्रशेखर राव यांनी मोठा डाव टाकला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राव यांनी आवतण दिले आहे. पंकजा आमच्या सोबत आल्यास त्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणाच त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पंकजा या पक्षावर मोठ्या प्रमाणात नाराज असून त्यांनी अनेकदा जाहीरपणे पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. यामुळे आता त्या ही ऑफर स्वीकारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.