नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत आणि चीन दरम्यानचा संघर्ष मे महिन्यापासून सुरू असताना आता पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या भागात भारतीय नौदलाचे सागरी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडो दल पूर्व लडाखमध्ये आधीपासून तैनात आहे. त्याचबरोबर निम्न सुरक्षा दलांच्या काही तुकडय़ाही तैनात आहेत. या सर्वाचे काम समन्वयाने सुरू आहे. सागरी कमांडो एकदम या भागात आणल्यास त्यांना तेथील हवामानाची कल्पना येणार नाही. त्यामुळे त्यांना टोकाच्या थंड वातावरणाशी जुळवून घेता यावे यासाठी तेथे थंडीच्या काळात तैनात केले आहे.
थंडीच्या काळात चीन आगळिक करण्याची शक्यता नाकारता येत नाही हेही एक कारण त्यात आहे. सागरी कमांडोंना तेथील सरोवरात सरावासाठी नवीन बोटी उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या ज्या सुविधा पँगाँग सरोवरात आहेत त्यात आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराची विशेष दले व निम्न विशेष दले तसेच मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अखत्यारीतील विशेष सीमा दले पूर्व लडाखमधील विशेष मोहिमांत आधीपासून कार्यरत आहेत.
भारतीय हवाई दलाची गरुड विशेष दले आता उंचावरच्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्याकडे ‘इग्ला शोल्डर फायर्ड’ पद्धतीची सुरक्षा प्रणाली असून जर प्रतिस्पर्धी सैनिक किंवा विमान सीमा ओलांडून आले तर त्यांचा मुकाबला करणे त्यामुळे शक्य होते. याआधी जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदलाने सागरी कमांडो वुलर सरोवरात तैनात केले होते. भारतीय हवाई दलाने काश्मीर खोऱ्यात गरुड हवाई कमांडो दल २०१६ मध्ये पठाणकोट येथे तैनात केले होते.