न्हावी ता. यावल, प्रतिनिधी । गेल्या अडीच महिन्यापासून न्हावी गावामध्ये प्रशासन ,ग्रामपंचायत, स्वयंसेवक व गावकऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तप्रिय लॉकडाऊन पाळला जात होता. कुंभारवाड्यातील ३८ वर्षीय किराणा दुकानदार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
किराणा दुकानदार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दुकानातील ४ कर्मचारी आई व पत्नी यांना विलगीकरण कक्षेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीस कोविड १९ जे. टी. महाजन केंद्रात हलविण्यात आले आहे. प्रशासनाचे अधिकारी लगेच परिसरात येऊन संपूर्ण परिसर कुंभारवाडा,राधे- राधे चौक , कोळीवाडा हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तसेच कुटुंबातील ११ जणांची थर्मल टेस्ट घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे .तसेच संपूर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यात आला. पॉझिटिव्ह व्यक्तीचे किराणा दुकान व गोडाऊन पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे. याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, सरपंच भारती चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, ग्रामविकास अधिकारी के. आर. देसले, तलाठी लीना राणे, पोलीस पाटील संजय चौधरी, डॉ. महाजन, बोरखेडा माजी उपसरपंच व न्हावी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत तळेले, रवींद्र तायडे व ग्रामपंचायत, तलाठी कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असून कोरोनाचा प्रसार होऊ नये , यासाठी होम क्वारंटाईन करून घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.