लखनऊ : वृत्तसंस्था । लखनऊ विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चे सदस्य आणि प्रमुख मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ‘या देशात मुस्लिमांनी नेहमीच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केलाय आणि करत राहणार’ असं सांगताना न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याच्या मुद्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.
‘या निर्णयावर बोलण्यासारखं आमच्याकडे काहीही नाही. ६ डिसेंबर १९९२ रोजी सार्वजनिकरित्या बाबरी मशीद कशी पाडण्यात आली आणि कायदा कसा पायाखाली तुडवण्यात आला हे सगळ्यांनीच पाहीलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं याचा उल्लेख ‘बेकायदेशीर विध्वंस’ असाही केला होता. अशावेळी कुणी दोषी आहे किंवा नाही, हे न्यायालयाला निश्चित करायचं होतं. आता मुस्लीम संघटना एकत्र येऊन या निर्णयाला आव्हान द्यायचं किंवा नाही तसंच आव्हान देण्यात काही अर्थ आहे किंवा नाही, याचा निर्णय घेतील. आव्हान देण्याचा कोणता फायदा होईल किंवा नाही हेदेखील काळच सांगू शकेल’, असं खालिद यांनी म्हटलंय.
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्या एस के यादव यांनी, अयोध्येतील बाबरी मशिदीचे अवशेष पाडणं हा पूर्वनियोजित कट नसून ती असामाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती होती, असं निर्णयात नमूद केलंय. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेले फोटो, व्हिडिओ पुरावे म्हणून मान्यता देण्यास न्यायालयानं नकार दिला. ठोस पुरावे नसल्याचं निरीक्षणही नोंदवत न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर दिल्लीच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात मिठाई वाटून सेलिब्रेशन करण्यात आलं.