नॉन कोविड रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन प्रणालीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-19 विषाणु महामारीच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत जळगांव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आलेले आहे. तसेच काही खाजगी दवाखाने देखील कोविड-19 रुग्णांकरीता अधिग्रहीत करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत कोविड-19 आजाराशिवाय अन्य व्याधी/आजाराच्या रुग्णांच्या उपचार व सोयीकरीता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 33 रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेव्दारे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर रुग्णालयाच्या नावांची यादी देखील उपलब्ध करुन दिलेली आहे.

तथापि, काहीप्रसंगी अन्य आजाराच्या रुग्णांना याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या नेमक्या रुग्णालयात न जाता रुग्णांची इतरत्र म्हणजेच या रुग्णालयातुन दुस-या रुग्णालयात भटकंती होत असते. निश्चित कोणत्या आजार/व्याधीसाठी कोणत्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत, तेथील बेड्स (Beds) उपलब्धतता व इतर तत्सम उपकरणांची उपलब्धतता, आदि माहितीच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होतात. यावर उपायोजना म्हणुन व रुग्णांना घरातुन निघतांनाच कोणत्या आजारासाठी कोणत्या रुग्णलयात जावे व तेथे खाटाची उपलब्धतता समजण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने Beds Availability & Management Systems हि ऑनलाईल प्रणाली सुरु केली आहे. यासाठी https://findbeds.online नावाचे संकेतस्थळ व ॲड्रॉईड ॲप्लीकेशन सुरु केलेले आहे. याव्दारे रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना आपल्या मोबाईल व संगणकावर घरबसल्या आवश्यक त्या आजाराचा उपचार करणेसाठी योग्य त्या रुग्णालयात बेड्स (Beds) शिल्लक आहे अथवा नाही हे बघता येणार आहे.

या संकेतस्थळावर तालुकानिहाय रुग्णालयांचा माहिती घेऊन त्यात खाटा शिल्ल्क आहेत काय, त्यात खाटासमवेतच ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व तत्सम सुविधा देखील रुग्णांना शोधता येणार आहेत. मोबाईल ॲड्रॉईड ॲप्लीकेशन www.zpjalgaon.gov.in व www.jalgaon.gov.in या वेबसाईटवरुन तसेच गुगल प्ले स्टोर वरुन देखील डाऊनलोड करता येणार आहे. संकेतस्थळावर व मोबाईल ॲप्लीकेशन वर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत पॅनलवरील व खाजगी रुग्णालये यांचे वर्गीकरण, रुग्णालयाचा संपुर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक, संपर्क व्यक्ती, आरोग्यदुत यांचे नांव व दुरध्वनी क्रमांक आदि माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

याशिवाय हे संकेतस्थळ व ॲप हाताळणी बाबत काही अडचणी असल्यास जिल्हा परिषद मधील वॉर रुम कक्षास 0257-2224268 या संपर्क क्रमांक संपर्क करता येईल. जिल्ह्यातील रुगणांच्या सोयीसाठी अशाप्रकारची माहिती माहिती रुगणांना एकत्रित मिळावी अशा सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिल्यात होत्या. त्यानुसार हे संकेतस्थळ व ॲप विकसीत करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड व प्रशांत होले यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.

या ॲप व संकेतस्थळाचे उद्घाटन आज छत्रपती शाहु महाराज सभागृह, जि.प.जळगांव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

यावेळी सर्वेक्षण पंधरवाड्यात सुरु असलेल्या विविध कार्यक्रमातंर्गत जळगांव जिल्हयातील ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन मधील व बाहेरील लो-रिस्क रुग्णांचे स्वॅब घेणे, ऑक्सिजन लेव्हल तपासणे, तापमान तपासणी करणे यासाठी दोन मोबाईल व्हॅन जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार व जळगांव परिवहन कार्यालयाच्या सहकार्यातुन तयार करण्यात आल्या असुन त्यांचेही लोकार्पण पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर जळगाव जिल्हा ॲग्रीकॉप्स यांचेतर्फे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 20 बेड भेट देण्यात आले आहे. ते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्याकडे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.  जिल्ह्यातील नागरीकांनी या संकेतस्थळाचा व ॲपचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.

Protected Content