नैतिक मूल्यांचे बिजारोपन करणारा ग्रंथ : बोधिसत्वाच्या जातक कथा – पंकज बोदडे

 

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहार कुशलाने व तत्वज्ञानाने अधिष्ठित असलेल्या जातक कथा ह्या जगांतील कथा साहित्याचा एक स्त्रोत किंवा मूलाधार असून मानवी जीवनाला आकार आणि दिशा देण्याचे आणि नैतिक मूल्यांचे बिजारोपन करण्याचे काम करीत जगाची संस्कृती उन्नत होण्यास मदत करीत असल्याने बुद्ध धम्म प्रणित संविधानिक नैतिकता राष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरली आहे, असे मार्मिक उद्गार सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलचे पर्यवेक्षक पंकज बोदडे यांनी केले.

सम्राट फाउंडेशन संचलित सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यमाने, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि ‘भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म’ या विषयांवर आयोजित चर्चासत्राच्या कार्यक्रमांत, ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाच्या प्रतिकांना वाहिलेला पुष्पमालांनी होताच नितीन झाल्टे सरआणि दिपाली लहासे मॅडम यानी पाली भाषेतील ‘रतन सुत्त’ मधूर स्वरांत गायिले. त्यानंतर सम्राट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनोमदर्शी तायडे यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला नितीन झाल्टे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये, भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म यांच्या समन्वयातूनच प्रबुद्ध भारत राष्ट्राची निर्मिती होईल, असा आशावाद बोलताना व्यक्त केला.

विचार मंचावर उपस्थित मान्यवर फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर म्हणाले की, “सामाजिक न्यायाशी निगडीत संविधान आणि बुद्ध धम्म ह्या दोन परस्पर सुसंगत प्रवृत्ती ज्या लोकशाही देशांत एकत्र नांदू शकतात, त्या देशांत राजा राणीच्या पोटातून नव्हे, तर मतपेटीतून जन्माला येतो. भारतात लोकशाही आहे.

परंतू लोकशाही मानसिकता नाही. परिणामत: देशांत सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकली नाही आणि राजकीय क्षेत्रात एक व्यक्ती एक मत या मुल्यांना काही अर्थ उरलेला दिसत नाही”, असे ते म्हणाले. आपल्या समारोपिय अध्यक्षीय भाषणांत आपले विचार मांडतांना ॲड. योगेश तायडे यांनी, ‘’भारतीय संविधानाच्या सरनामात नमूद केलेले देशाचे उद्दीष्टे आणि बुद्ध धम्माचे ध्येय उद्दीष्टे सारखेच आहे. म्हणून शासन व्यवस्थेमध्ये बुद्ध धम्माचा साधन म्हणून वापर व्हावा, असे बाबासाहेबांना वाटत असावे”, असे सांगितले. विचार मंचावर उपस्थितीत सर्व मान्यवारांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांना विद्यार्थ्यांना खीरदान करण्यात आले. कारण खीर या पदार्थाला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी तायडे यांनी केले आणि रंजना बोदडे यांनी आभार मानले.

यावेळी सम्राट फाउंडेशनचे उपाध्यक्ष व ‘सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक’ ॲड. योगेश तायडे हे अध्यक्ष स्थानी होते आणि विचार मंचावर – शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, नितीन झाल्टे, तेजस्विनी, दिपाली लहासे, रंजना बोदडे, कविता बैसाणे, विक्रम तायडे, प्रदीप तायडे, दीपक बोदडे आणि कुंदन तायडे यांच्यासह आदिमान्यवर उपस्थित होते.

Protected Content