जळगाव, प्रतिनिधी । नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. बी. एन.पाटील व डॉ. पंकज आशिया यांचा सत्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केला.
जिल्हा परिषदेचे ३५ वे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारला आहे. याप्रसंगी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी महिला व बालविकास अधिकारी आर.आर.तडवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
मुळचे राजस्थानातील जोधपूर येथील रहिवासी असलेले डॉ. पंकज आशिया यांनी निम्स मेडीकल कॉलेजातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१६ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून २९वी रँक मिळवली आहे. फरिदाबाद येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर निधी आयोगाचे सहाय्यक सचिव, कळवण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मालेगाव येथे कोरोना काळात स्पेशल मॉनिटरिंग ऑफीसर म्हणून काम केले आहे. कोरोना काळात मालेगाव आणि भिवंडी या दोन शहरांमध्ये विशेष आरोग्य सुविधा दिल्या आहेत. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पहिला हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरासाठी डॉ. आशिया यांची शासनाने स्पेशल मॅनिटरिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली होती. मालेगावात कमी कलावधीत कोरोनाच्या लाटेला अटकाव करणार्या मालेगाव पॅटर्नमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य, शिक्षण, कुपोषणावर अधिक भर देणार असून जिल्ह्यातील समस्यांचा अभ्यास करुन नवीन योजना कार्यान्वित करण्यात येईल,अशी ग्वाही नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या घटली असली तरी कोविडच्या तिसर्या लाटेसाठी सज्ज राहून कोविड केअर सेंटरमध्ये अद्ययावत सुविधा, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा या गोष्टींवर लक्ष देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
दरम्यान,जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात मावळते मख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांचा निरोप समारंभ व नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांना स्वागत समारंभ जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1345395352529934