नूतन मराठा महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवाड्यास प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालय जळगाव मराठी विभाग आयोजित भाषा संवर्धन पंधरवडाचा प्रारंभ ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते प्रा. व. पु. होले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल..पी..देशमुख यांच्या हस्ते भित्तीपत्रकचे अनावरण करुन करण्यात आला.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रा. व. पु. होले यांचं “वाचन संस्कृती” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी दिपप्रज्वलन आणि प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख मान्यवर तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रा. व. पु. होले यांचा परिचय मराठी विभागाचे प्रा राकेश गोरासे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रयोजन व त्यामागील उद्देश आणि भूमिका आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी मांडली.
वाचन संस्कृतीवर बोलताना प्रा. व. पु. होले यांनी, वाचन हे उत्तराच्या पावसाप्रमाणे झिरपणारे आणि रुजणारे असले पाहिजे त्यासाठी वाचन, चिंतन ,मनन आणि रुजवन असे टप्पे असावेत, काय वाचावे ?,काय वाचू नये ? याची समज असली पाहिजे, ग्रंथात आणि त्याच्या वाचनात खुप मोठी ताकद असते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अब्दूल कलाम, हिटलर आणि आण्णा हजारे यांच्या जीवनात वाचनाने झालेल्या अमुलाग्र बदलांचे उदाहरणे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एल. पी. देशमुख यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा व्याख्यानं मालांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हा पंधरवडाच नव्हे तर जवळपास वर्षभर भाषा संवर्धनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून आमचं महाविद्यालय काम करत राहणार आहे. याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी समारोप झालेली सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती म्हणजे ३ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारी व्याख्यानमाला होय अस़ं सांगत अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन मराठी विभागाच्या डॉ. सुषमा तायडे यांनी तर आभार मराठी विभागाचे प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी .देशमुख, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख, मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर, मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक सर्व शाखेचे विभाग प्रमुख आणि सर्व शाखेचे प्राध्यापक उपस्थित होते.

Protected Content