चोपडा प्रतिनिधी । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागण गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.. ह्या उक्तीप्रमाणे काल तालुक्यातील जनता व शेतकर्यांनी निसर्गाचे रौद्ररूप अनुभवले. जोराचे वारावादळ, विजांचा कडकडाट, बोरसुपारी सारखी गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे मोठमोठे व्रुक्ष, विजेचे खांब, घरांवरील छत पत्रे तसेच शेतीतील सर्व रब्बीचा हंगाम क्षणार्धात मातीमोल झाला. रात्रीची वेळ फक्त दहा मिनीटात होत्याचे नव्हते असे झाले. सुर्योदयासोबतच ह्या निसर्गचक्रापुढे पुन्हा हारला तो फक्त आमचा शेतकरीराजाच, अशी ह्रदयद्रावक खंत गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.
याआधी खरीपचा हंगाम पुर्ण अतिवृष्टिमुळे पाण्यासोबतच वाहुन गेल्याने शेतकऱ्यांना खायला दाणाच काय पण गुराढोरांना चारा सुद्धा उरलेला नव्हता. एक रूपया उत्पन्न नसतांना पुन्हा रब्बीसाठी हजारो रूपये उचल करून शेतीशिवार फुलविणारा शेतकरी ह्या अवकाळीमुळे पुरता मरणासन्न झालेला आहे. जगाचा पोशिंदाच जर उपाशी राहत असेल तर जग कुणाच्या भरवशांवर चालणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, यासाठी सरकारातील लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील जनतेसह शेतकऱ्यांना खुप मोठी आर्थिक मदत व संपुर्ण कर्जमाफी मिळवुन दिली पाहिजे, अशीही अपेक्षा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.