रावेर, शालिक महाजन । तालुक्यातील १ हजार १२५ शेतक-यांनी ज्वारी व मका राज्यशासनाला विक्रीसाठी दि ३ नोंव्हेंबरपासून ऑनलाइन नंबर लावला आहे. परंतु १८ दिवस उलटून सुध्दा भरड धान्य ठेवण्यासाठी गोडाऊनच उपलब्ध न करून दिल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
तहसीलदार म्हणतात गोडाऊन उपलब्ध आहे. परंतु शेतक-यांच्या याद्या दिल्या नसल्याने खरेदी प्रलंबित आहे. तर संघाचे मॅनेजर म्हणतात मागील १८ दिवसांपासून आम्ही गोडाऊनच्या वेटींगवर आहे. यासाठी पत्रव्यवहार सुध्दा झाला आहे. परंतु याद्या महसुलने काल मागविल्या असून त्या देखील तात्काळ दिल्या आहे. त्यामुळे निव्वळ निष्काळजीपणामुळे शेतक-यांची खरेदी रखडली आहे. निंबोल (ता.रावेर) येथील मका उत्पादक शेतकरी राजेंद्र पाटील सांगतात की, दिवाळी तोंडावर होती म्हणून अनेक शेतक-यांनी पहाटे तिनवाजेपासून रांगेत नंबर लावुन खरेदी विक्री संघात ज्वारी व मका विक्रीसाठी नंबर लावले होते. परंतु, दिवाळी होऊन आठ दिवस उलटले परंतु आज आमचा एक दाना सुध्दा गोडाऊन अभावी मोजला गेला नाही. यात सर्व निष्काळजीपणा सुरु असून आमच्या प्रचंड अपेक्षाभंग झाल्या आहेत.
गोडाऊन अभावी खरेदी केंद्र आहे बंद- मॅनेजर
खरेदी विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी सांगतात की, आमच्याकडून महसूल प्रशासनाला दि ३ नोंव्हेंबरलाच धान्य ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे पत्रव्यवहार केला आहे. परंतु काल आम्हाला तहसीलदारां कडून शेतक-यांच्या याद्या मागविल्या होत्या. त्या याद्या आम्ही त्यांना तात्काळ दिल्या आहे. खरेदी-विक्री संघ शेतक-यांचे धान्य खरेदी करण्यासाठी तयार आहे. आज १८ दिवस उलटले परंतु आम्हाला गोडाऊन उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील शेतक-यांची मका व ज्वारी खरेदी रखडली आहे.
११२५ शेतक-यांनी केलीय ऑनलाइन नोंदणी
राज्यशासनाला ज्वारी व मका विक्रीसाठी रावेर तालुक्यातील १ हजार १२५ शेतक-यांनी पहाटे तिन वाजता रांगेत उभे राहून ऑनलाइन नोंदणी केली आहे. शासनाने ज्वारी’ला २ हजार ६२० तर मक्या’ला १ हजार ८५० रुपये भाव निश्चित केला आहेत.
शेतक-यांची नावे प्राप्त होताच गोडाऊन दिले जाईल- तहसीलदार
महसूल प्रशासनाकडे शेतक-यांच्या नावांची यादी न मिळाल्याने उपलब्ध असलेले गोडाऊन खरेदी विक्री संघाला दिले नाही यामुळे शेतक-यांची दिवाळी अंधारात गेली. तर तहसीलदार म्हणतात आमच्याकडे गोडाऊन उपलब्ध आहे संघाने किती शेतक-यांचे ऑनलाइन नाव नोंदले आहे त्यांचे नाव आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्सच्या याद्या खरेदी विक्री संघाकडून मागविल्या आहे. याद्या प्राप्त होताच त्यांना गोडाऊन दिले जाईल असे सांगितले