जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विनापरवानगी निष्काळजीपणे गर्भपात केल्यामुळे अधिक रक्तस्त्राव झाल्याने एंरडोल तालुक्यातील तोडी गावातील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गर्भपात करणार्या महिला डॉक्टरला बुधवारी २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
डॉ. सुरेखा शामलाल तोतला (रा. मारवाडी गल्ली एरंडोल)असे डॉक्टर महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल येथील डॉक्टर सुरेखा तोतला यांच्याडे गर्भपात करण्याचा परवाना नसतांना त्यांनी कुसूमबाई बाळासाहेब मराठे (रा. तोडी रा. एरंडोल) यांचा निष्काळजीपणे गर्भपात केला होता. गर्भपात करतांना रक्तस्त्राव झाल्याने महिलेलचा मृत्यू झाल्याची घटना २२ जून २०१२ रोजी घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहन गणेश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डॉ. सुरेखा तोतला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर, न्या. डी. एस. देशपांडे व जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकारपक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. या खटल्यात डॉ. संग्राम पाटील, आत्माराम मराठे, अशोक काकडे, तत्कालीन तहसीलदार इंदिरा चौधरी, मयताची जेठानी कल्पनाबाई पाटील, पती बाळासाहेब पाटील, शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांच्यासह तपासधिकार्यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. बुधवारी २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता न्यायालयाने युक्तीवाद व साक्षीदारांच्या साक्षी व पुराव्यांवरुन डॉ. तोतला यांना दोषी ठरवित त्यांना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.