निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राहुल गांधींना भेटले

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लागोपाठ दोनदा भेट घेतल्यानंतर प्रशांत किशोर आता थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.

 

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.  यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील हजर होती. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घ्यायला लागले आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नेमकं प्रशांत किशोर यांचं चाललंय काय? याविषयी  तर्क लढवले जात आहे.

 

दरम्यान, आज राहुल गांधींसोबत झालेली भेट ही आगामी पंजाब विधानसभा निवडणुका आणि पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर झाल्याचं सांगितलं जात आहे.

 

गेल्या महिन्याभरात प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कपूरथला हाऊस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

 

Protected Content