निवडणूक आयोगाविरुद्ध ममता बॅनर्जीचे परवानगीशिवाय आंदोलन

 

कोलकाता : वृत्तसंस्था । तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने 24 तास प्रचारबंदी केली आहे. या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनीही आक्रमक भूमिका घेत मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन सुरु केलंय. आंदोलनाची परवानगी नसली तरी त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

 

तृणमूल काँग्रेसने सकाळी पत्र लिहून धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, एवढ्या कमी वेळात आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र, ममता बॅनर्जी यांनी सकाळी 11.30 पासूनच धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

 

 

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपसाठी निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनले असल्याची घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसचे नेते करत आहेत. निवडणूक आयोगाने केलेली कारवाई ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि असंविधानिक आहे. निवडणूक आयोग पक्षपाती बनलं आहे. भाजप नेत्यांवर त्यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केलाय.

 

निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय.निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.

 

निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी 12 एप्रिल हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलंय.

Protected Content