जळगाव प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने आदेश दिले होते. तरीही पाचोरा, अमळनेर, चोपडा येथील तीन उमेदवारांनी जाहिराती संनियंत्रण समितीकडून प्रमाणीकरण न केल्याने आचारसंहितेचा भंग, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.
यामुळे त्यांच्यावर कारवाईचे आदेश आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. दोन दिवसात उमेदवारांना खुलासा सादर करण्यास
सांगण्यात आले आहे.
कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येत नाही. तरीही अमळनेरचे भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी, पाचोऱ्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरेश पाटील यांनी आज जाहिरातींचे प्रमाणीकरण न करता जाहिराती प्रसिद्ध केल्या आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला
जाणार आहे.