जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या निधी फाऊंडेशनकडून लॉकडाऊन काळात देखील आपले कर्तव्य चोख बजावले जात आहे. लॉक काळात जळगावी निवारागृहात व्यवस्था करण्यात आलेल्या महिला, मनोबल वसतिगृहातील विद्यार्थिनी तसेच सध्या ट्रकने आपल्या राज्यात परत जात असलेल्या महिला, मुलींना निधी फाऊंडेशनतर्फे मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरित केले जात आहे.
जळगावातील निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्यासह सर्व सहकारी ठिकठिकाणी मासिक पाळी विषयी जनजागृती करण्याचे कार्य करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापूर्वी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सामानाची दुकाने सुरू असली तरी सुजाण नागरीक खबरदारी म्हणून घराबाहेर पडणे टाळत आहेत. दीपस्तंभ फाऊंडेशनचा उपक्रम असलेल्या मनोबल वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या मदतीसाठी वैशाली विसपुते यांनी पुढाकार घेतल्या. विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरीत करण्यात आले. दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेन्द्र महाजन यांनी संपर्क करताच वैशाली विसपुते यांनी मदतीचा हात दिला.
निवारागृहातील महिलांना केली मदत
लॉकडाऊन असल्याने सर्व दळणवळण सुविधा ठप्प होत्या त्यामुळे अनेक कुटुंब पायीच घरी जाण्यासाठी निघाले होते. जळगावातील लाडवंजारी मंगल कार्यालयात देखील अशा कुटुंबांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणी अनेक परप्रांतीय मुली व महिला देखील होत्या. मासिक पाळीच्या वेळी त्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून वैशाली विसपुते यांनी त्यांना सॅनिटरी नॅपकिन वितरित केले.
ट्रकने प्रवास करणाऱ्या महिला, मुलींसाठी पुढाकार
लॉकडाऊन काळात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी शिथिलता देण्यात आल्याने अनेक मजूर कुटुंबासह ट्रकने घरी जाऊ लागले. ट्रकने प्रवास करणाऱ्या महिला, मुलींना प्रवासात मासिक पाळी आल्यास त्यांची कुचंबना होऊ लागली. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांना याबाबत आदिवासी संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी कळविले. निधी फाऊंडेशनने लागलीच महामार्गावर धाव घेतली आणि ट्रकने प्रवास करणाऱ्या महिला, मुलींना त्यांनी सॅनिटरी नॅपकिन वितरित केले.